लोणावळा प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महाराष्ट्र दिनी, १ मेपासून वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे घाट विभागातील वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सुमारे १३.३ किलोमीटर लांबीच्या या नव्या मार्गामुळे खोपोली–लोणावळा दरम्यानचा सुमारे १९ किलोमीटरचा अवघड घाट विभाग पूर्णपणे बायपास होणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पावर सुमारे ६,६०० ते ६,७०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आशियातील सर्वांत रुंद बोगद्यांचा समावेश असलेल्या या मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, विशेषतः बोगद्यांमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आधारित स्वयंचलित सुरक्षाप्रणाली बसविण्यात आली आहे.
बोगद्यांमध्ये आग, धूर अथवा विषारी वायूंचा प्रसार झाल्यास त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. ‘लिनिअर हीट डिटेक्शन’ केबल्सच्या माध्यमातून तापमानातील बदल काही क्षणांत टिपले जातील. एखाद्या वाहनाला आग लागल्यास उच्च दाबाचा ‘वॉटर मिस्ट फायर सप्रेशन सिस्टम’ स्वयंचलितपणे कार्यान्वित होऊन आग विझविण्याचे काम सुरू करेल. दर चार मीटर अंतरावर बसविण्यात आलेल्या नोजल्समधून प्रतिमिनिट सुमारे ३६.५ लिटर पाण्याची फवारणी होणार आहे.
याशिवाय, बोगद्यांतील हवेची गुणवत्ता सतत तपासण्यासाठी विशेष सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांसारख्या घातक वायूंचे प्रमाण वाढल्यास तत्काळ इशारा देऊन ‘जेट फॅन्स’च्या सहाय्याने हवेचा प्रवाह नियंत्रित केला जाईल. सुमारे १,५०० आरपीएम वेगाने फिरणारे हे फॅन्स २०० मीटरपर्यंत प्रभावीपणे हवा खेळती ठेवतील.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ६० मीटरवर आपत्कालीन बटण, तर दर १५० मीटरवर ‘एसओएस’ कॉल बॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून वाहतुकीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास डिजिटल फलकांच्या माध्यमातून वाहनचालकांना तात्काळ सूचना देऊन वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबई – पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, घाट विभागातील अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता असून, प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.


