मुंबई प्रतिनिधी
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात आयोजित लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी नेस्को संकुलात मोठ्या प्रमाणावर लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे 3 ते 4 हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. कॉन्सर्टदरम्यान मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन मोठ्या प्रमाणावर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच दरम्यान काही तरुणांची प्रकृती बिघडली.
यातील दोन विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू झाला असून मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे समजते. तसेच आणखी एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही तरुणींना जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कार्यक्रमाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे शहरात ड्रग्जचे वाढते प्रमाण आणि तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


