सातारा प्रतिनिधी
कोल्हापूरहून पुण्याकडे धावणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर नियोजनपूर्वक दरोडा टाकून प्रवाशांची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडत अवघ्या २० ते २५ मिनिटांत चोरट्यांनी प्रवाशांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. मिरज रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चोरट्यांनी वरच्या सिग्नलची वायर कापून टाकली, तर खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून तो निष्क्रिय केला. सिग्नल बंद असल्याचे लक्षात येताच मोटरमनने संभाव्य धोका ओळखून गाडी थांबवली. याच संधीचा फायदा घेत तीन अज्ञात चोरटे गाडीत शिरले.
खिडकीलगत बसलेल्या प्रवाशांना लक्ष्य
गाडी थांबताच चोरट्यांनी विशेषतः खिडकीजवळ व दरवाज्याजवळ बसलेल्या प्रवाशांना लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले, तर एका प्रवाशाचा मोबाईल फोनही चोरला. संपूर्ण प्रकार अतिशय वेगाने घडल्याने प्रवाशांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. अंदाजे ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिग्नल पुन्हा कार्यान्वित; गाडी पुढे रवाना
दरम्यान, सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच शेणोली व भवानीनगर स्थानकांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिग्नलवर बांधलेले कापड काढून यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर सह्याद्री एक्सप्रेसला पुढे मार्गस्थ करण्यात आले.
गाडी कराड स्थानकात पोहोचल्यानंतर प्रवाशांनी घडलेल्या प्रकाराची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. घटनेची गांभीर्याने दखल घेत लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
श्वानपथकांचा वापर; आरोपी फरार
दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पुणे, सोलापूर आणि मिरज येथून श्वानपथके घटनास्थळी पाचारण करण्यात आली. मात्र, अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाची नोंद मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून उपनिरीक्षक सुभाष मुंडे पुढील तपास करत आहेत.
रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवणे आणि त्यानंतर प्रवाशांची लूट करणे, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे रेल्वे प्रवासाची सुरक्षितता धोक्यात येत असून सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. पहाटेच्या वेळी कमी वर्दळ असलेल्या मार्गांवर सुरक्षा वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.


