तिरुअनंतपुरम/ गुवाहाटी:
केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी येथे आज (दि. ९ एप्रिल) विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असून तीनही ठिकाणी मिळून एकूण २९६ जागांसाठी मतदार आपला कौल देणार आहेत. सर्व ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान पार पडत असून निवडणूक आयोगाने सुरक्षा व्यवस्था आणि मतदान केंद्रांवर आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकांकडे देशाचे राजकीय लक्ष लागले असून अनेक पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
केरळमध्ये डावी आघाडी विरुद्ध काँग्रेस आघाडी
केरळमध्ये १४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे सत्तारूढ डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांच्यात मुख्य लढत आहे. तसेच भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेही सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांनी राज्यात आपले अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात गेल्या दहा वर्षांपासून डाव्या आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी आघाडीसाठी सत्ता टिकवण्याची, तर काँग्रेस आघाडीसाठी सत्ता हस्तगत करण्याची संधी मानली जात आहे.
केरळमध्ये सुमारे २ कोटी ७१ लाख मतदार असून ते ८८३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानातून ठरवणार आहेत. राज्यभरात हजारो मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
आसाममध्ये भाजप हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात
ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये १२६ जागांसाठी मतदान होत आहे. येथे सत्तारूढ भाजप तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या (हॅट्ट्रिक) प्रयत्नात आहे. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे.
या राज्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी यांच्यात थेट सामना होत आहे. तसेच एआययूडीएफ पक्षाचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी ३० जागांवर उमेदवार उभे केले असून काही मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये ३५ जिल्ह्यांतील ३१ हजार ४९० मतदान केंद्रांवर मतदान होणार असून ७२२ उमेदवार रिंगणात आहेत.
पुदुच्चेरीत ३० जागांसाठी मतदान
केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी येथे ३० जागांसाठी मतदान होत आहे. येथे एआयएनआरसीच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे.
इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वाधिक १६ जागांवर निवडणूक लढवत असून या आघाडीत द्रमुकचाही समावेश आहे. पुदुच्चेरीमध्ये एकूण २९४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. छोट्या प्रदेशातही ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोंडा पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द
दरम्यान, गोव्यातील पोंडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केली आहे. ही निवडणूकही ९ एप्रिल रोजी होणार होती.
या प्रकरणी दोन मतदारांनी न्यायालयात याचिका दाखल करताना, संबंधित मतदारसंघाचा कार्यकाळ संपण्यासाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना पोटनिवडणूक घेणे नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेतला होता. या याचिकेवर सुनावणी करत न्या. वाल्मिकी मेनेझेस आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने बुधवारी निर्णय देत अधिसूचना रद्द करण्याचे आदेश दिले.


