नवी दिल्ली वृत्तसंस्था
आम आदमी पार्टीकडून राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर खासदार राघू चड्डा यांनी अखेर मौन सोडत पक्षाच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आणि अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावर निशाणा साधला.
Silenced, not defeated
My message to the ‘aam aadmi’
—
खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ'आम आदमी’ को मेरे संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3
— Raghav Chadha (@raghav_chadha) April 3, 2026
चढ्ढा म्हणाले, “माझा आवाज शांत करण्याचा प्रयत्न झाला आहे. पण मी शांत बसणार नाही. मी हरलेलो नाही आणि माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘आप’मधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत.
जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा आहे का?
व्हिडिओमध्ये बोलताना चढ्ढा यांनी संसदेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच आपल्यावर कारवाई झाल्याचा दावा केला. “मी संसदेत बोलतो तेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडतो. कदाचित मी असे विषय उचलतो जे सहसा संसदेत चर्चिले जात नाहीत. पण जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या बोलण्यामुळे देशातील आम आदमीचा फायदा झाला असेल, पण त्यामुळे पक्षाचे नेमके काय नुकसान झाले हे मला अजूनही समजलेले नाही.”
उपनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय
दरम्यान, आम आदमी पार्टीने नुकतेच राज्यसभा सचिवालय ला पत्र पाठवून राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली होती. त्यांच्या जागी पंजाबमधील खासदार अशोक मित्तल यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पक्षाच्या कोट्यातून चढ्ढा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ पद बदलण्यापुरता मर्यादित नसून पक्षातील गंभीर मतभेदांचे संकेत देणारा मानला जात आहे.
“माझ्या शांततेला हार समजू नका”
पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना चढ्ढा यांनी सूचक इशारा दिला. “ज्यांनी मला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सांगू इच्छितो – माझ्या शांततेला माझी हार समजू नका. मी तो समुद्र आहे जो वेळ आल्यावर सैलाब बनतो,” असे ते म्हणाले.
‘आप’मध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
या घडामोडींमुळे आम आदमी पार्टी मध्ये अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पक्षाने अधिकृतपणे या वादावर भाष्य केले नसले तरी चढ्ढा यांच्या वक्तव्यांमुळे दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ नेतृत्वावर राजकीय दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राज्यसभेतील महत्त्वाच्या पदावरून हटवणे आणि बोलण्यावर निर्बंध घालण्याची मागणी करणे हा मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. आगामी काळात या वादाचा परिणाम पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर आणि संसदीय कामकाजावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


