मुंबई प्रतिनिधी
नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी बुधवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महापौरांनी आयुक्त भिडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांचा सत्कार केला. नव्या आयुक्तांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या प्रशासनाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही महापौरांनी व्यक्त केला.
महापौर दालनात झालेल्या या भेटीदरम्यान शहराच्या विकासकामांबाबत, नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या प्रसंगी उपमहापौर संजय घाडी, सभागृहनेते गणेश खणकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, नंतर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यानही नवनियुक्त आयुक्त आश्विनी भिडे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला सभागृहनेते गणेश खणकर यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.
तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही या वेळी उपस्थित होते. आयुक्त भिडे यांनी शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यावर प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे संकेत दिले.
नव्या आयुक्तांच्या स्वागतामुळे महापालिकेच्या प्रशासनात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, शहरातील प्रलंबित विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


