जळगाव प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे तसेच त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावर फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यात प्रस्तावित साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका मागासवर्गीय महिलेने केल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन खरेदीचा व्यवहार
भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात २००२ साली सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली काही शेतजमिनींची खरेदी करण्यात आली होती. प्रस्तावित “तापी–पुर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज” या सहकारी साखर कारखान्यासाठी विविध शेतकऱ्यांकडून जमीन घेतली गेली होती.
या व्यवहारात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. जमीन खरेदी करताना तायडे कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचे तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या साखर कारखान्यात रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आगाऊ रक्कम दिल्यानंतर व्यवहार पूर्ण
तक्रारीनुसार, जमीन व्यवहाराच्या वेळी तायडे कुटुंबाला आमदार खडसे यांच्या वतीने ५१ हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला.
मात्र उर्वरित मोबदला देण्यात येईल असे सांगितले असतानाही अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही संपूर्ण रक्कम देण्यात आली नाही, असा आरोप तायडे कुटुंबाने केला आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला; मात्र त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.
कारखाना उभारलाच नाही, जमीन मुलीच्या नावावर
दरम्यान, संबंधित जागेवर अनेक वर्षे उलटूनही सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला नाही. २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी केली असता जमीन शारदा खडसे यांच्या नावावर नोंद झाल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे धक्का बसलेल्या तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदत मागितली. अडकमोल यांनी प्राथमिक पडताळणी केली असता संबंधित जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
खरेदीखतात खाडाखोड झाल्याचा आरोप
११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची प्रत तपासली असता गंभीर बाब समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दस्तऐवजात खाडाखोड करून “तापी-पुर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज” या नावाच्या जागी “शारदा एकनाथ खडसे” असे नाव लिहिल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच खरेदीखताच्या पान क्रमांक १३ वरही अशाच प्रकारे बदल करून शारदा खडसे यांचे नाव समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले. यामुळे या व्यवहाराबाबत संशय अधिकच वाढला.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, पोलिसांना चौकशीचे आदेश
या पार्श्वभूमीवर तायडे कुटुंबाने ९ मार्च २०२६ रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
त्यानंतर चमेलाबाई तुकाराम तायडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.
या कलमान्वये गुन्हा दाखल
तक्रारीच्या आधारे आमदार एकनाथ खडसे, त्यांची मुलगी शारदा खडसे, मध्यस्थ सुधाकर निनू पाटील तसेच बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ५४/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ४० आणि ३(३) यांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलम ३(१)(एफ) व ३(१)(जी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर फसवणूक व अॅट्रॉसिटीचे गंभीर आरोप झाल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


