वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात संपूर्ण अमेरिकेत अभूतपूर्व जनआंदोलन उसळले असून ‘नो किंग्स’ या घोषणेअंतर्गत देशातील सर्व ५० राज्यांमध्ये सुमारे ३३०० ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. “आम्हाला राजा नको, लोकशाही हवी” अशा घोषणांनी अनेक शहरांत वातावरण दणाणून गेले.
इराणसोबतच्या युद्धाला महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प प्रशासनाच्या कथित ‘हुकूमशाही’ निर्णयांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या लोकशाही आंदोलनांपैकी एक म्हणून या निदर्शनांकडे पाहिले जात आहे.
मिनेसोटामध्ये आंदोलनाचा केंद्रबिंदू
आंदोलनाचा सर्वात मोठा मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस – सेंट पॉल या जुळ्या शहरांमध्ये दिसून आला.
डिसेंबरमध्ये ट्रम्प प्रशासनाने राबवलेल्या ‘ऑपरेशन मेट्रो सर्ज’ अंतर्गत हजारो फेडरल एजंट्सनी नागरिकांवर कथितपणे कठोर कारवाई केल्याचा आरोप आहे. या कारवाईदरम्यान दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले.
मोर्चेकऱ्यांनी “नागरिकांवर दडपशाही बंद करा” आणि “लोकशाही वाचवा” अशा घोषणा देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
कलाकार आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा
या आंदोलनाला अमेरिकेतील अनेक नामांकित कलाकार आणि नेत्यांचा उघड पाठिंबा मिळत आहे.
हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डी निरो यांनी आंदोलकांचे कौतुक करताना ट्रम्प प्रशासनावर टीका केली. “लोकशाहीसाठी लढणाऱ्या या नागरिकांचे धैर्य कौतुकास्पद आहे,” असे ते म्हणाले.
डेमोक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते ,बर्नी सँडर्स यांनीही कठोर शब्दांत इशारा देत सांगितले की, “अमेरिका हुकूमशाहीकडे किंवा मूठभर श्रीमंतांच्या सत्तेकडे झुकू देणार नाही.”
याशिवाय रॉक संगीतविश्वातील दिग्गज Bruce Springsteen आणि लोकसंगीत गायिका Joan Baez यांच्या गाण्यांनी आंदोलनाला भावनिक ऊर्जा दिली.
वॉशिंग्टनमध्ये तीव्र निषेध
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डि सी येथेही मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.
लिंकन स्मारक आणि वॉशिंग्टन स्मारक परिसरात हजारो आंदोलक जमा झाले.
निदर्शकांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कागदी पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. “लोकशाहीवर हल्ला थांबवा”, “आम्हाला राजा नको” अशा घोषणा सतत दिल्या जात होत्या.
ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून वाद
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त एआय व्हिडिओ पोस्टमुळेही राजकीय वातावरण तापले आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी तीव्र टीका करत राष्ट्राध्यक्षांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
युरोपमध्येही प्रतिध्वनी
अमेरिकेतील या आंदोलनाचे पडसाद जगभर उमटताना दिसत आहेत. रोम, आणि बर्लिन या शहरांमध्येही ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणांविरोधात निदर्शने झाली.
विशेष म्हणजे अमेरिकेतील ग्रामीण आणि पुराणमतवादी भागांतही आता ट्रम्प प्रशासनाविरोधात असंतोष वाढत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मध्यावधी निवडणुकांवर परिणाम?
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांवर या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टी ला या जनक्षोभाचा राजकीय फटका बसू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
अमेरिकेतील लोकशाही, युद्धनीती आणि सरकारच्या अधिकारांविषयी सुरू झालेली ही चर्चा आगामी काही महिन्यांत अमेरिकेच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण करू शकते.


