नवी दिल्ली वृत्तसंस्था
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधनपुरवठा, गॅस उपलब्धता आणि निर्माण झालेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण ऑनलाईन बैठक घेतली. पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा, इंधनसाठ्याची स्थिती, पुरवठा साखळी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराट या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
PM Narendra Modi is chairing the meeting with CMs through video conferencing on the West Asia conflict to review preparedness and plans of states. pic.twitter.com/pqJS3iCgro
— ANI (@ANI) March 27, 2026
पंतप्रधानांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करत, कोणत्याही परिस्थितीत देशातील नागरिकांना इंधन आणि गॅसचा पुरवठा खंडित होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.
इंधन टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये घबराट
पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवांमुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या ड्रम किंवा टाक्यांमध्ये डिझेल साठवून ठेवण्यास सुरुवात केल्याचेही चित्र दिसत आहे.
या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष गरज असलेल्या ग्राहकांना इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने मात्र पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की देशात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मुळे पुरवठ्यावर दबाव
भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातील देशांकडून आयात करतो. स्वयंपाकाचा गॅस आणि पाइपलाइन गॅसच्या पुरवठ्यासाठीही भारत मोठ्या प्रमाणावर या प्रदेशावर अवलंबून आहे. बहुतेक तेलवाहू जहाजे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीमार्गे भारतात पोहोचतात.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर टँकर वाहतुकीवर काही प्रमाणात मर्यादा आल्याने जागतिक स्तरावर पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे भारताकडे येणाऱ्या तेलवाहू जहाजांना या मार्गावरून सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी इराणकडून विशेष परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या तरी पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला नाही.
कोरोना काळातील ‘टीम इंडिया’ मॉडेलचा आधार
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कोरोना महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे केलेल्या कामाची आठवण करून दिली. त्याच धर्तीवर या संकटाचाही सामना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारांनी स्थानिक पातळीवर इंधन आणि गॅसचा सुयोग्य पुरवठा आणि वितरण सुनिश्चित करावे, अनावश्यक साठेबाजी रोखावी आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रशासन आणि तेल कंपन्यांनी नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती देत घबराट कमी करण्यावर भर द्यावा, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
इंधन उपलब्धतेवर केंद्राचा विशेष भर
केंद्र सरकारने देशातील तेलसाठ्याची स्थिती आणि आयातीचे पर्यायी मार्ग याबाबतही आढावा घेतल्याचे समजते. परिस्थिती गंभीर झाल्यास पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
“इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी कोरोनाकाळाप्रमाणे एकजुटीने काम करणे गरजेचे आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारने पुन्हा एकदा नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या मते, सध्या देशात इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही.


