नवी दिल्ली वृत्तसंस्था
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधनटंचाई आणि संभाव्य लॉकडाऊनच्या अफवांनी जोर धरला होता. सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये ‘पुन्हा लॉकडाऊन लागू होणार’ अशी चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या सर्व चर्चांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट केले की, भारतात लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. केंद्र सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती
मध्यपूर्वेतील तणावामुळे एलपीजी गॅसची संभाव्य टंचाई, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता याबाबत चर्चा सुरू असताना देशात लॉकडाऊन लागू होईल अशी अफवा वेगाने पसरली. काही शहरांमध्ये नागरिकांनी खबरदारी म्हणून पेट्रोल पंपांवर गर्दी केली. पेट्रोल आणि डिझेल साठवण्यासाठी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
“अफवा पसरवणे बेजबाबदार कृत्य”
हरदीप सिंग पुरी म्हणाले, “देशात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणीतरी जाणीवपूर्वक अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अत्यंत बेजबाबदार आणि हानिकारक कृत्य आहे.”
ते पुढे म्हणाले की, सध्याची जागतिक परिस्थिती काहीशी अनिश्चित असली तरी केंद्र सरकार ऊर्जा आणि पुरवठा साखळीशी संबंधित सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
इंधनपुरवठा सुरळीत; सरकार सज्ज
पुरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील इंधन, ऊर्जा आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे. देशात सध्या ऊर्जा पुरवठा नियमित सुरू असून कोणत्याही संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे.
भारताने यापूर्वीही जागतिक संकटांच्या काळात एकजुटीने परिस्थितीला तोंड दिले आहे. भविष्यात अशी काही परिस्थिती उद्भवल्यास देश त्यावरही सक्षमपणे मात करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून थेट ३ रुपये प्रति लिटरपर्यंत कमी केले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांवरून शून्यावर आणले आहे.
या निर्णयामुळे इंधन दरांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.


