सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या केवळ संशयावरून संतापलेल्या एका बापाने स्वतःच्या दोन मुलींना रात्रभर घराच्या छताला उलटे लटकवून अमानुष छळ केल्याने एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.
मृत मुलीचे नाव सारिका दादू यमगर असे असून ती शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी होती. तर तिची बहीण अनुजा यमगर हिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चोरीच्या संशयातून संताप
मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात यमगर कुटुंब वास्तव्यास आहे. सारिका आणि अनुजा या दोन्ही बहिणींवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. शेजाऱ्याने मुलींवर चोरीचा आळ घेतल्याने त्यांच्या वडिलांचा संताप अनावर झाला.
संतापाच्या भरात दादू हैबत यमगर या वडिलांनी प्रथम दोन्ही मुलींना बेदम मारहाण केली. त्यानंतरही राग शांत न झाल्याने त्यांनी घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोघींनाही दोरीने उलटे लटकवून ठेवले. हा अमानुष छळ तब्बल रात्रभर सुरू होता.
पाण्यासाठी आक्रोश, पण दया नाही
रात्रभर उलटे लटकवून ठेवल्याने दोन्ही मुली वेदनेने तडफडत होत्या. त्या वारंवार पिण्यासाठी पाणी मागत होत्या, मात्र निर्दयी बापाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. थंडी, भूक आणि मारहाण यामुळे दोन्ही मुलींची प्रकृती अधिकच खालावली.
पहाटेच्या सुमारास सारिका ही बेशुद्ध पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. तर अनुजा ही गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडली.
मृत्यू लपवण्याचाही प्रयत्न
घटनेनंतर कुटुंबीयांनी हा प्रकार बाहेर येऊ नये म्हणून सारिकावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अनुजाला शुद्ध आली आणि तिने संपूर्ण प्रकार डॉक्टरांना सांगितला.
रुग्णालय प्रशासनाने तातडीने आटपाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि या भीषण घटनेचा भांडाफोड झाला.
आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी दादू हैबत यमगर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेचा अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत.
गावात संतापाची लाट
चोरीच्या केवळ संशयावरून स्वतःच्या पोटच्या मुलींना अशा अमानुष पद्धतीने शिक्षा देण्याच्या घटनेने बनपुरी गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


