मुंबई प्रतिनिधी
मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर घेणे हे सर्वसामान्यांसाठी मोठे स्वप्न ठरते. वाढत्या घरांच्या किंमती, मर्यादित जागा आणि वाढती मागणी यामुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घर घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलत आहे. मुंबई मंडळाच्या वतीने सुमारे २५०० घरांची संगणकीय लॉटरी एप्रिल २०२६ मध्ये काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सोडतीची अधिकृत जाहिरात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदारांना घरांसाठी अर्ज करण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी पूर्ण करून एप्रिल अखेरीस संगणकीय सोडत काढली जाईल.
अनेक भागांत घरे उपलब्ध
मुंबई मंडळाच्या या सोडतीत शहरातील महत्त्वाच्या परिसरांमध्ये घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये गोरेगाव, मुलुंड, चेंबूर आणि विक्रोळी या भागांचा समावेश आहे. त्यामुळे मध्य आणि उपनगरांमध्ये घर घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
यामध्ये कन्नमवार नगर येथे मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) तब्बल १२२१ घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच पत्राचाळ परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) ८५ घरांची सोडत काढली जाणार आहे.
याशिवाय मागाठाणे, सायन प्रतिक्षा नगर आणि विक्रोळीतील इतर प्रकल्पांतील घरांचाही या सोडतीत समावेश असणार आहे.
बाजारपेठेपेक्षा कमी दरात घरे
म्हाडाच्या घरांचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही घरे खाजगी बाजारपेठेतील किंमतीपेक्षा तुलनेने कमी दरात उपलब्ध होतात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबांसाठी घर घेण्याची ही महत्त्वाची संधी ठरते.
मात्र २०२४ च्या सोडतीत घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर सोडत निघाली नव्हती, त्यामुळे अनेक इच्छुक अर्जदार प्रतीक्षेत होते.
दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठी संधी
आता तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत २५०० घरांची मोठी सोडत जाहीर होण्याची शक्यता असल्याने घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेषतः मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही लॉटरी मोठी संधी ठरणार आहे.
म्हाडाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया, घरांच्या अचूक किंमती, आरक्षण गट आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


