स्वप्नील गाडे | प्रतिनिधी
मुंबईतील सांताक्रूझ पूर्व परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या युगांडाच्या दोन महिलांवर वाकोला पोलिसांनी कारवाई केली आहे. या दोन्ही महिला गेल्या सुमारे दहा वर्षांपासून भारतात अवैधरित्या राहत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकोला पोलीस ठाण्याचे पथक कालीना येथील शिवनगर परिसरातील फातिमा हाऊस येथे गेले. तेथे दोन विदेशी महिला वास्तव्यास असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपण युगांडा देशाच्या नागरिक असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्यांच्या पासपोर्ट व व्हिसाची तपासणी करण्यात आली असता दोघींचा व्हिसा कालावधी संपलेला असून कोणतीही वैध परवानगी नसताना त्या भारतात राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून युगांडा देशाचे नागरिकत्व व पासपोर्ट संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
या दोन्ही विदेशी महिलांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असून त्यांना हद्दपार करण्याबाबतचा अहवाल परकीय नागरिक नोंदणी अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, परिमंडळ ८ चे पोलीस उपआयुक्त, वाकोला विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात मसपोनि योगिता तराळे, सपोनि तळेकर, मपोउपनि घाडगे आणि मपोशि माने यांचा समावेश होता.


