मुंबई प्रतिनिधी
मार्च महिना संपत आला असतानाच राज्यात उन्हाचा चटका तीव्र होत चालला आहे. एकीकडे मराठवाडा व काही भागात अवकाळी पावसाची हजेरी सुरू असताना दुसरीकडे कोकण पट्ट्यात उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांची काहिली होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) महत्त्वाचा इशारा देत ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. मंगळवारी तापमान आणखी वाढून 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेसोबत दमट वातावरणही राहणार असल्याने उकाड्याचा त्रास अधिक जाणवू शकतो.
यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 5 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे लागल्यास डोक्यावर टोपी किंवा रुमाल, पाण्याची बाटली सोबत ठेवावी तसेच उन्हापासून स्वतःचे संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, तापमान 38 अंशांच्या आसपास असताना दीर्घकाळ उन्हात राहिल्यास उन्हाळा लागणे, निर्जलीकरण आणि थकवा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, राज्यात हवामानाची स्थिती दोन टोकाची दिसत आहे. एका बाजूला कोकण व मुंबई परिसरात उष्णतेची लाट जाणवत असताना दुसरीकडे राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठवाडा आणि इतर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत अवकाळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव मात्र वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


