नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेच्या प्रकरणात न्यायालयीन लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
खरातविरोधात सातत्याने नव्या तक्रारी समोर येत असताना आणि पीडित महिलांची संख्या वाढत असल्याने सरकारने हा खटला कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनुभवी आणि गुंतागुंतीच्या खटल्यांचा मोठा अनुभव असलेल्या अजय मिसर यांच्या नियुक्तीमुळे या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत अजय मिसर?
ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर हे राज्यातील नामांकित फौजदारी वकील म्हणून ओळखले जातात. दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित अनेक उच्चप्रोफाइल प्रकरणांत त्यांनी सरकारी वकील म्हणून प्रभावीपणे बाजू मांडली आहे.
विशेषतः 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच “२०११ मधील मुंबईतील ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट” प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याच्याशी संबंधित खटल्यातही त्यांनी सरकारी बाजू मांडली होती.
याशिवाय नाशिकमधील धान्य घोटाळ्यासारख्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांतही त्यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांत मिसर यांना मोठा अनुभव असल्याचे मानले जाते.
SIT कडून सखोल तपास
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू असून, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार या दोन्ही अंगांनी तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. खरातने धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, पूजाविधी तसेच भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून अलीकडेच आणखी तीन नव्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. नव्या तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित विद्यार्थिनीशी खरातने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आज न्यायालयात हजर
दरम्यान, अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या वेळी पोलिसांकडून पुढील तपासासाठी कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
नव्या तक्रारी, वाढणारे आरोप आणि आता विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती या पार्श्वभूमीवर न्यायालयात आज काय घडामोडी होतात आणि पोलिसांना किती दिवसांची कोठडी मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


