नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्वयंघोषित अंकज्योतिषी अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असताना तपास यंत्रणांनी आता नागरिकांकडे थेट मदतीचे आवाहन केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सोमवारी दोन मोबाईल क्रमांक आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत नागरिकांना महत्त्वाची माहिती पुढे आणण्याचे आवाहन केले.
नाशिकमधील या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असून अनेक महिलांवर कथित लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. तपासाचा वेग वाढवण्यासाठी आणि संभाव्य पीडितांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सातपुते यांनी प्रथमच सार्वजनिक आवाहन केले आहे.
नागरिकांनी माहिती द्यावी : सातपुते
SIT प्रमुख सातपुते यांनी सांगितले की, या गुन्ह्यांबाबत कोणाकडेही उपयुक्त माहिती असल्यास ती तातडीने तपास पथकापर्यंत पोहोचवावी. “या आरोपीने कोणावर अन्याय केला असेल किंवा कोणाकडे संबंधित माहिती असेल, तर त्यांनी निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती; दोन मोबाईल क्रमांक जाहीर
तपासासाठी नागरिकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यात
• पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी
• पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे
• पोलीस निरीक्षक राहुल मोरे
यांचा समावेश आहे.
तक्रारी किंवा माहिती देण्यासाठी ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ हे दोन मोबाईल क्रमांक सार्वजनिक करण्यात आले आहेत. या क्रमांकांवर थेट संपर्क साधून पीडित महिलांनी किंवा साक्षीदारांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत सहा गुन्हे नोंद
दरम्यान, अशोक खरात याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विशेष तपास पथकाकडून या सर्व प्रकरणांची एकत्रित चौकशी वेगाने सुरू आहे. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्या तरी संभाव्य पीडित महिलांकडून तक्रारी पुढे येण्याचे प्रमाण कमी असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यामुळे सातपुते यांचे आवाहन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विधानसभेतही पडसाद
या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी स्थगन प्रस्ताव आणत या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रतिक्रिया देताना या प्रकरणाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले.
तसेच या प्रकरणाबाबत सरकारकडून विधानसभेत सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणात येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


