नाशिक प्रतिनिधी
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात मोठी घडामोड घडली. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवत त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पुढील काही दिवस एसआयटीकडून होणाऱ्या चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरातविरोधात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून नव्याने दाखल झालेल्या तक्रारींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून एसआयटीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
कोर्टात काय घडलं?
मंगळवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अशोक खरातला तोंडावर काळा कपडा टाकून नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी पक्षाने गंभीर आरोपांची मालिका मांडत तपासासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्यासारखे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली. या शस्त्राचा वापर करून पाच नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना असल्याचेही सरकारी पक्षाने सांगितले. यासंदर्भात काही प्राथमिक पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला.
वन्यजीव शिकार आणि ‘कस्तुरी’चा धक्कादायक आरोप
सरकारी पक्षाने न्यायालयात आणखी धक्कादायक माहिती मांडली. अशोक खरातवर वन्यजीवांची शिकार केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला. तपासात असे समोर आले की, आरोपीने हरणाची शिकार करून त्यापासून ‘कस्तुरी’ तयार केली आणि ती भक्तांना दिल्याचा संशय आहे.
याशिवाय तो भक्तांना साप आणि वाघ दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करत असे, अशी माहितीही तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडून ६ लाख ५३ हजारांची रोकड, लॅपटॉप आणि काही मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांद्वारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला.
आरोपीच्या वकिलांचा बचाव
सरकारी पक्षाने आरोपांची मालिका मांडल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्याला विरोध केला. पोलिसांकडे आधीच सात दिवसांची कोठडी होती आणि त्या काळात पुरेसा तपास झाला आहे. पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्याची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
तसेच, या प्रकरणात पेन ड्राईव्हचा कोणताही ठोस उल्लेख नाही आणि आवश्यक कागदपत्रे रजिस्टर कार्यालयातून मिळू शकतात, असेही बचाव पक्षाने सांगितले.
न्यायालयाने खरातलाच विचारला प्रश्न
निकाल देण्यापूर्वी न्यायालयाने स्वतः अशोक खरातला प्रश्न विचारला की, “तुला काही सांगायचे आहे का?”
यावर उत्तर देताना खरात म्हणाला की, “बनावट साप आणि वाघ दाखवल्याचा आरोप मी पहिल्यांदाच ऐकत आहे. मला सापाबद्दल काहीही माहिती नाही.”
ईशानेश्वर मंदिरात नियमित पूजा केल्याचा आरोपही त्याने फेटाळला. “मी त्या मंदिरात कधीतरी जातो. श्रावणी सोमवार किंवा महाशिवरात्र असेल तेव्हाच जातो. तेव्हाही माझ्यासोबत शंभरपेक्षा जास्त लोक असतात,” असे तो म्हणाला.
अखेर न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता पुढील काही दिवस तपास यंत्रणा खरातकडून आणखी माहिती उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान, नरबळी, वन्यजीव शिकार, अंधश्रद्धा आणि आर्थिक फसवणूक अशा गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


