नाशिक प्रतिनिधी
स्वयंघोषित अंकज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्याभोवती गुन्ह्याचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. खरातच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज उघड करत त्याच्या कथित गैरकृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या ऑफिसबॉय नीरज जाधव याला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी खरातची तब्बल आठ तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक विधी आणि अंकज्योतिषाच्या नावाखाली शेकडो महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप खरातवर करण्यात आले आहेत. या प्रकरणातील काही व्हिडिओ क्लिपही तपास यंत्रणांच्या हाती लागल्या असून त्यामुळे तपासाला वेग आला आहे. मात्र चौकशीदरम्यान खरात पोलिसांना अपेक्षित सहकार्य करत नसल्याचेही समोर येत आहे.
ऑफिसबॉय नीरज जाधव कोण?
अटक करण्यात आलेला नीरज जाधव हा खरातच्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, जाधवच्या नातलग असलेल्या एका महिलेवर खरातने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही बाब समजल्यानंतर जाधवने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आणि त्यातून खरातच्या कथित गैरप्रकारांचे व्हिडिओ बाहेर आणले.
जाधवने या प्रकरणाची माहिती एका पीडित महिलेलाही दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्या महिलेनेच त्याच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात बदनामी आणि विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात आता पोलिसांनी नीरज जाधवला अटक केली आहे. या अटकेमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
महिलांना ‘संमोहन’ करून जाळ्यात ओढल्याचा आरोप
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी आणि विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अनेक महिला येत असत. त्यावेळी तो स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा अवतार असल्याचा दावा करीत असल्याचे समोर आले आहे. काही महिलांना तो संमोहनासारख्या तंत्रांचा वापर करून प्रभावाखाली आणत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, काही महिलांना गुंगीची औषधे देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचेही आरोप समोर आले आहेत. या संदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम सध्या तपास यंत्रणा करीत आहेत.
महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी
या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील या पथकात नाशिक शहर, ग्रामीण आणि शिर्डी येथील सुमारे १२ ते १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एसआयटीकडून खरातच्या कार्यालयासह विविध ठिकाणी झाडाझडती घेण्यात येत असून अनेक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
पाचशे कोटींच्या मालमत्तेची चर्चा
तपासादरम्यान खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची चर्चा रंगली आहे. नाशिकमधील आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आलिशान फार्महाऊस, त्याच ठिकाणी असलेली सुमारे ७० एकर जमीन तसेच शिर्डीतील कोट्यवधींची मालमत्ता त्याच्या नावावर किंवा नातलगांच्या नावे असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व मालमत्तेची किंमत जवळपास ५०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी खरातच्या घरावर टाकलेल्या झडतीदरम्यान पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तपास यंत्रणा विविध आर्थिक व्यवहारांचाही तपास करीत आहेत.


