नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करून ज्योतिषाच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आली असून, तपासाची सूत्रे हाती घेताच अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड मात्र एका व्हिडिओमुळे झाला. खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉयने एका २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर पीडित महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.
ब्लॅकमेलिंगमधून उघडकीस आले प्रकरण
पोलिस तपासानुसार, खरातच्या कार्यालयात काम करणारा संशयित नीरज जाधव हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. डिसेंबर २०२५ मध्ये त्याने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याचा संशय आहे. या फुटेजमध्ये अनेक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे.
तपासात असेही समोर आले की, या व्हिडिओंचा आधार घेऊन नीरज जाधव आणि त्याच्या काही साथीदारांनी अशोक खरात याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वादग्रस्त क्लिप्स सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याच्याकडे तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
मात्र, खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर नीरजने वेगळीच युक्ती वापरली. त्याने काही पीडित महिलांना लक्ष्य करून त्यांना व्हॉट्सॲपवर मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ मेहुण्याला पाठवल्याने फुटला भांडाफोड
या ब्लॅकमेलिंगदरम्यान नीरजने सिडको परिसरातील एका २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ थेट तिच्या मेहुण्याला पाठविला. अचानक आलेल्या या व्हिडिओमुळे कुटुंबात खळबळ उडाली.
मात्र, मेहुण्याने संबंधित महिलेला धीर देत संपूर्ण प्रकार समजून घेतला आणि तिला पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर पीडितेने नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदविली.
याच तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून खरातच्या कथित गैरकृत्यांचे धागेदोरे समोर येऊ लागले.
कार्यालयातून अत्याचाराचे संशयित ठिकाण
नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात खरात महिलांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनेक महिलांना ज्योतिष सल्ला, भविष्य सांगणे किंवा वैयक्तिक अडचणी सोडविण्याच्या नावाखाली कार्यालयात बोलावले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
घरातून रोकड, फार्महाऊसमधून पिस्तूल जप्त
दरम्यान, पोलिसांनी कर्मयोगीनगरमधील खरातच्या घरावर छापा टाकला असता तेथून सुमारे सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय सिन्नर येथील त्याच्या फार्महाऊसवरून पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.
त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्या सर्व प्रकरणांची कागदपत्रे आता एसआयटीने ताब्यात घेतली आहेत.
एसआयटीकडून उच्चस्तरीय तपास
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करत आहेत. त्यांनी नाशिकमध्ये दाखल होत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
एसआयटीमध्ये नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी एसआयटीकडे सुपूर्द करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
आणखी नावे समोर येण्याची शक्यता
तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणात अजून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. काही महिलांनी अद्याप पुढे येऊन तक्रार केलेली नसल्याचीही शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.
एसआयटीच्या चौकशीतून संपूर्ण रॅकेट उघड होईल आणि पीडित महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


