नाशिक प्रतिनिधी
नाशिकमध्ये भोंदू ज्योतिषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली असताना या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुख असलेल्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी पहिल्याच दिवशी कठोर भूमिका घेत खरातची तब्बल दोन ते तीन तास कसून चौकशी केली. त्यांच्या या कारवाईमुळे ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात याचा माज पहिल्याच दिवशी उतरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
नाशिक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अशोक खरात याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली. या व्हिडिओंमधून महिलांच्या लैंगिक शोषणाचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात किती महिलांवर अत्याचार झाले असावेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे देण्यात आले आहे.
‘कॅप्टन’ची दोन ते तीन तास चौकशी
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी अशोक खरातची पहिल्याच दिवशी सखोल चौकशी केली. विशेषतः महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत आणि त्याच्या ताब्यात सापडलेल्या पेन ड्राइव्हमधील व्हिडिओंबाबत त्यांनी तपशीलवार प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चौकशीदरम्यान खरातकडून अनेक महत्त्वाच्या माहितीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत IPS तेजस्वी सातपुते?
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या महाराष्ट्रातील दबंग आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्या २०१२ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असून त्यांची कामाची पद्धत कडक आणि तपासकेंद्री असल्याने त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील असलेल्या सातपुते यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्या यापूर्वी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्याशिवाय पुणे शहरात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
एसआरपीएफमध्ये समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले असून संवेदनशील प्रकरणांच्या तपासासाठी त्यांची नियुक्ती अनेकदा करण्यात आली आहे.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठीही शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. आता अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तिसरी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
मंदिराच्या आडून शोषणाचा आरोप
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथे स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने ‘श्री शिवनिका संस्थान’ अंतर्गत ईशान्येश्वर मंदिराच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही समोर आले आहे.
यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नावे चर्चेत आली आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोकांची त्याच्याकडे उठबस असल्याची माहितीही समोर येत आहे.
दरम्यान, एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अजून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


