रणजीत मस्के|प्रतिनिधी
लातूर : शेतजमिनीचा गैरवापर करून उसाच्या पिकामध्ये गांजाची अवैध लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याविरोधात लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत ३४ किलो ८०५ ग्रॅम वजनाचा, सुमारे ५ लाख २२ हजार ७५ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, गोंदेगाव (ता. जि. लातूर) येथील राजकुमार छत्रभुज देशमुख (वय ५६) हा स्वतःच्या शेतातील उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १८ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक १३२ मधील शेतात छापा टाकला. पाहणीदरम्यान उसामध्ये लपवून लावलेली १०८ गांजाची झाडे आढळून आली.
पोलिसांनी पंचांसमक्ष ही झाडे मुळासकट उपटून पोत्यांमध्ये भरली व त्यांचे वजन केले. त्यामध्ये एकूण ३४ किलो ८०५ ग्रॅम गांजा आढळून आला. या मुद्देमालाची अंदाजित किंमत ५ लाख २२ हजार ७५ रुपये इतकी आहे. आरोपीने आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने ही लागवड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, नायब तहसीलदार गजानन अंबर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सर्जेराव जगताप, मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, प्रदीप चोपणे, संतोष खांडेकर, शासकीय व्हिडिओग्राफर सुहास जाधव, वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक टी. टी. टेकाळे, तसेच कृषी विभागाचे पंच राहुल अंधारे आणि दिलीप पोतदार यांनी सहभाग घेतला.
लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.


