मुंबई प्रतिनिधी
ठाणे : कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील खंडणीप्रकरणी कुख्यात गँगस्टर रवीप्रकाश सुलय्या पुजारी उर्फ रवी पुजारी याला ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी तो दीर्घकाळापासून पाहिजे आरोपी होता. मंगळवारी त्याला मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने २७ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रवी पुजारी हा फरार होता. परदेशात वास्तव्यास राहून तो गुन्हेगारी कारवाया करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. पुढे २०१९ मध्ये सेनेगल येथे त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर आणि न्यायालयीन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला बंगळुरू कारागृहातून १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३६ वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणात त्याला औपचारिक अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा खटला मोक्का विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील तपास ठाणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे करत आहेत.


