ठाणे प्रतिनिधी
ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानाच्या मालकाला महापालिकेच्या कारवाईची भीती दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने रंगेहात अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अक्षय करंजवकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सुर्वे हा मानपाडा परिसरात, तर करंजवकर हा कोलबाड भागात राहतो. या प्रकरणी गौरव स्वीट्सचे मालक विरल भानजी पटेल (५८) यांच्या तक्रारीवरून चितळसर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पटेल यांची ठाणे शहरात गौरव स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानाच्या सुमारे १२ शाखा आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये मानपाडा येथील कॉसमॉस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात पटेल उपस्थित असताना अक्षय करंजवकर हा दुकानात आला. त्याने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने स्टॉलचे फोटो काढण्यास सुरुवात केली आणि ठाणे महापालिकेकडे तक्रार करून कारवाई करवून घेण्याची धमकी दिली.
याचवेळी त्याने “दर महिन्याला काही रक्कम द्या, अन्यथा सातत्याने तक्रारी करून महापालिकेकडून कारवाई घडवून आणू,” अशी धमकी देत पैशांची मागणी केली. मात्र पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही करंजवकरने महापालिकेत तक्रार अर्ज दाखल करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला.
दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे याने पटेल यांना व्हॉट्सअॅप कॉल करून अक्षय करंजवकरसोबत तडजोड करून देण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र चर्चेनंतर दोन लाख रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त पराग मणेरे आणि सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले आणि सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी वसंत विहार परिसरात कारवाई केली. तडजोडीनंतर दोन लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी वसंत विहार चौकात आले असताना पटेल यांच्याकडून पैसे घेताना पोलिसांनी दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास चितळसर पोलिस करत आहेत.


