मुंबई प्रतिनिधी
भांडुप परिसरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्याची तब्बल ३९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत अज्ञात व्यक्तींनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी ईस्ट सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मोंडकर (नाव बदललेले) हे २०१९ साली बेस्ट सेवेतून निवृत्त झाले आहेत. २९ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने स्वतःची ओळख बिनी शर्मा अशी करून देत मोंडकर यांच्या नावावर घेतलेले एक सिमकार्ड बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरले जात असल्याचे सांगितले.
यानंतर काही वेळातच हा फोन मनोज शिंदे नावाच्या व्यक्तीकडे देण्यात आला. त्याने स्वतःला मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे सांगत मोंडकर यांच्याशी संवाद साधला. शिंदेने मोंडकर यांना त्यांच्या नावावर सुरू असलेल्या कथित सिमकार्डचा वापर मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचा दावा करत त्यांना अटक होण्याची भीती दाखवली.
या भीतीचा फायदा घेत आरोपींनी मोंडकर यांच्याकडून कुटुंबीयांची माहिती, बँक खात्याचे तपशील तसेच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची माहिती मिळवली. पुढे ‘कायदेशीर कारवाई सुरू आहे’ असे सांगत त्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद देण्यात आली. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असल्याचा आभास निर्माण करून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली.
त्यानंतर तपासासाठी पैसे तात्पुरते सुरक्षित खात्यांमध्ये जमा करण्याचे कारण देत आरोपींनी मोंडकर यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून एकूण ३९.६० लाख रुपये उकळण्यात आले.
काही दिवसांनंतर हा प्रकार संशयास्पद वाटू लागल्याने मोंडकर यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे ईस्ट सायबर पोलिसांनी अज्ञात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि डिजिटल व्यवहारांचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलीस किंवा सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाहीत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने अशा प्रकारे धमकी देत पैसे मागितल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.


