रायपूर :
रायपूर : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर विपुल यादव यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात पती-पत्नीतील वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रायपूर येथील विधायक कॉलनी परिसरात घडली. घटना घडली त्या वेळी यादव यांची पत्नी कामानिमित्त दिल्ली येथे गेली होती. घरकाम करणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास यादव यांनी घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे आल्याने ही बाब उघडकीस आली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमाकांत साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा यादव यांची दोन्ही मुले घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. त्यामुळे त्यांना या घटनेची कल्पना नव्हती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि न्यायवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत पती-पत्नीमध्ये काही वैयक्तिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. मात्र केवळ याच कारणामुळे आत्महत्या झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी किंवा लिखित नोट आढळून आलेली नाही.
विपुल यादव हे छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या पत्नीही पूर्वी हवाई दलात कार्यरत होत्या; सध्या त्या बंगळुरू येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती आहे. दोघांनी २०१४ मध्ये प्रेमविवाह केला होता. यादव हे उत्तर प्रदेशातील अझमगड येथील मूळ रहिवासी असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


