फलटण प्रतिनिधी
फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ९३ कोटी ३५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील रस्ते, दळणवळण व्यवस्था तसेच विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
या निधीसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. मंजूर झालेली सर्व विकासकामे तातडीने सुरू करण्यात येतील आणि कामांची गुणवत्ता राखली जाईल, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली आहे.
मंजूर निधीतून मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सासवड–भाडळे बु.–सोनवडी–विडणी–सांगवी, गिरवी–मांडवखडक–निरगुडी–निंभोरे–जिंती–कोहाळे, काळज–सासवड–हिंगणगाव–सालपे, जिंती–साखरवाडी–नांदल–वाघोशी–उपळवे–गिरवी, कांबळेश्वर रोड ते सोमंथळी, आरडगाव–हिंगणगाव तसेच भुईंज–देगाव–राऊतवाडी–पिंपोडे आणि वाई–परखंदी–सोळशी–पिंपोडे या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.
याशिवाय मतदारसंघातील अनेक प्रमुख जिल्हा मार्ग आणि ग्रामीण जोडरस्त्यांच्या सुधारणेचाही निर्णय घेण्यात आला आहे. सासवड, नायगाव, राजुरी, टाकळवाडे, कुरवली, गिरवी, सांगवी, ठाकुरकी, तावडी, पिंपळवाडी, फडतरवाडी, सुरवडी, सोनवडी, ढवळ, तरडगाव, जाधववाडी, गुणवरे, निंबळक आणि कापडगाव आदी गावांमधील विविध जोडरस्ते मजबूत करण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच गटार बांधकामही करण्यात येणार आहे.
तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे, रस्त्यांची बाह्य सुधारणा करणे आणि पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या ठिकाणी पूल बांधण्याची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. निरगुडी येथील लांडगेवस्ती रस्त्यावर ओढ्यावर पूल उभारणे तसेच गुणवरे ते मठाचीवाडी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे या महत्त्वाच्या कामांचाही या निधीत समावेश आहे.
या विकासकामांमुळे मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते जाळे अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच व्यापारी व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


