सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक ७ मध्ये कार्यरत असलेल्या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विलास सर्जेराव शिंदे (३५) असे मृत जवानाचे नाव असून ही घटना गुरुवारी (१२ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुळेगाव (दक्षिण) परिसरात घडली.
मूळचे कळंब (जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले शिंदे मागील काही वर्षांपासून सासरच्या घरी मुळेगाव येथे पत्नी व मुलांसह राहत होते. शिंदे हे दौंड येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते, तर त्यांची पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले.
नातेवाईकांच्या माहितीनुसार, विलास शिंदे व पूनम काळे यांचा २०१४ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी तसेच ५ वर्षांची मुलगी व ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


