मुंबई प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित करत टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयासह भारताने एकूण तिसऱ्यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी उंचावण्याचा मान पटकावला.

या ऐतिहासिक यशानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. ने भारतीय संघासाठी १३१ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. संघाच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.
आयसीसीकडूनही पारितोषिक
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाला International Cricket Councilकडून सुमारे २७.४८ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला अंदाजे १४.६५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी एकूण सुमारे १२० कोटी रुपयांचा पारितोषिक निधी ठेवला होता.
दोन वर्षांत चार आयसीसी ट्रॉफी
गेल्या दोन वर्षांत भारतीय क्रिकेटने उल्लेखनीय यशाची मालिका कायम ठेवली आहे. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०२५ मध्ये एकदिवसीय स्वरूपातील चॅम्पियन्स ट्रॉफीवरही भारताने नाव कोरले. त्याच वर्षी भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकत देशाला आणखी एक गौरव मिळवून दिला. याशिवाय १९ वर्षांखालील भारतीय संघानेही अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील भारताचा प्रवास
स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने अमेरिकेवर २९ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर नामिबियाला नमविताना संघाने विजयी लय कायम ठेवली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.
नेदरलँड्सवर १७ धावांनी मात केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा डाव १११ धावांत आटोपला. पुढील सामन्यात झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवताना संघाने पुनरागमन केले. वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी नमवत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध सात धावांनी रोमांचक विजय मिळवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम सामन्यात मात्र भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करत इतिहास घडवला.


