सुरत :
गुजरातमधील सुरत येथे दोन कॉलेज तरुणींचे मृतदेह मंदिराच्या वॉशरूममध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघी जिवलग मैत्रिणी असून त्यांनी भूल देण्याच्या औषधाचा ओव्हरडोस घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोबाईलमधील शोध इतिहास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) चॅटमुळे या घटनेचा धागा पोलिसांना मिळाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
ही घटना सुरतजवळील आत्मीया संस्कार धाम स्वामी नारायण मंदिर परिसरात घडली. रोशनी शिरसाठ (वय १८) आणि जोशना चौधरी (वय २०) अशी मृत तरुणींची नावे असून त्या सुरतच्या दिंडोली परिसरात वास्तव्यास होत्या. दोघीही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या आणि त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कॉलेजला जाताना बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघी नेहमीप्रमाणे स्कूटरवरून कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी चिंतेतून पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे तपास सुरू केला.
टॉवर लोकेशनवरून मंदिरापर्यंत पोहोच
मोबाईलच्या टॉवर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता लोकेशन स्वामीनारायण मंदिर परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक मंदिरात पोहोचले. तेथे मंदिराच्या आवारातच दोघींची स्कूटर उभी असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्ही फुटेजमधील धागा
मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर या दोन्ही तरुणी वॉशरूममध्ये जाताना दिसल्या; मात्र त्या बाहेर येताना दिसल्या नाहीत. यानंतर पोलिसांनी वॉशरूमजवळ जाऊन दरवाजा ठोठावला; मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघींचे मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले.
मोबाईलमधील शोध इतिहासातून संशय
पोलिसांनी दोघींचे मोबाईल फोन जप्त करून तपास केला. त्यावेळी त्यांनी “त्रास न होता आयुष्य कसे संपवता येईल?” अशा स्वरूपाचे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉटवर शोधल्याचे आढळून आले. तसेच भूल देण्याच्या औषधाच्या ओव्हरडोसशी संबंधित बातम्यांचे स्क्रीनशॉटही मोबाईलमध्ये आढळले.
घटनास्थळावरून भूल देण्याच्या औषधाच्या बाटल्या आणि वापरलेल्या सिरिंजही जप्त करण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी औषधाचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
कारणांचा शोध सुरू
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्ड, संदेश आणि सोशल मीडिया संवादही तपासले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे सुरत शहरात मोठी खळबळ उडाली असून तरुणांमधील मानसिक तणाव आणि त्यावर योग्य मार्गदर्शनाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


