सांगली प्रतिनिधी
महिला सबलीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सुमारे पाच लाख मुलींना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जूनपासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘कन्या सबलीकरण’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात कराटे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी प्रायोगिक स्वरूपात उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगत पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील ५० शाळांमधील सुमारे ३६ हजार मुलींना दर शनिवारी एक तास कराटे व ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी १५ हजार ४०० मुलींना पहिला ‘येलो बेल्ट’ प्रदान करण्यात आला आहे. पुढील बेल्टसाठी आवश्यक असलेले शुल्कही प्रशासनाच्या वतीने भरले जाईल.”
तसेच जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे कौतुक केले. “मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून मला माझ्या दोन मुलींची आठवण झाली. या मुलींचे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल,” असे ते म्हणताच कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
या उपक्रमाअंतर्गत कराटे प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थिनींना येलो बेल्ट ग्रेडचे प्रमाणपत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमामुळे मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव आणि आत्मविश्वास वाढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


