पुणे प्रतिनिधी
मुंबई – पुणे दरम्यान वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित तिसऱ्या द्रुतगती मार्गाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या नवीन द्रुतगती मार्गासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या महिन्याभरात भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. मुंबई–पुणे दरम्यानचा हा नवा महामार्ग भविष्यातील मुंबई बेंगलोर – एक्सप्रेस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग असणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी या प्रकल्पाची घोषणा केली होती. मुंबई–पुणे मार्गावरील वाढती वाहनसंख्या, सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर होणारी वाहतूक कोंडी आणि औद्योगिक व व्यापारी हालचालींची वाढ लक्षात घेऊन या तिसऱ्या द्रुतगती मार्गाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात पागोटे ते चौक
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पागोटे (अटल सेतू परिसर) ते चौक या टप्प्यातील काम हाती घेतले जाणार आहे. या मार्गाची आखणी पूर्णपणे नव्याने करण्यात येत असून, पुढे कर्जत परिसरातील चौक येथून पुढे हा मार्ग पुण्याकडे वाढवण्यात येणार आहे.
चौक ते शिवापूर या टप्प्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला आहे. या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादनाचाही मोठा भाग मार्गी लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आठपदरी मार्ग, भविष्यात सोळा मार्गिकांची क्षमता
नवीन द्रुतगती मार्ग सुरुवातीला आठपदरी (८ लेन) करण्यात येणार आहे. मात्र भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन हा मार्ग सोळा मार्गिकांपर्यंत विस्तारता येईल अशी क्षमता ठेवण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १०० मीटर रुंदीची जमीन संपादित करण्यात येणार आहे.
घाट विभागात स्वतंत्र नवा रस्ता
या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घाट विभागातील रस्ता. सध्या लोणावळा ते खोपोली दरम्यानचा घाट भाग विद्यमान द्रुतगती मार्ग आणि ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र नव्या प्रकल्पात या घाट विभागात पूर्णपणे स्वतंत्र असा तिसरा रस्ता उभारला जाणार आहे.
या मार्गावर आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून बोगदे, उड्डाणपूल आणि उंच पूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक अधिक सुरक्षित व वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
पवना खोऱ्यातून पुण्याकडे जोडणी
नवीन द्रुतगती मार्ग लोणावळा येथून पवना व्हॅली मार्गे मुळशीपरिसरातून पुढे जात खेड- शिवापुर येथील पुणे रिंग रोड, प्रकल्पाशी जोडला जाणार आहे.
यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
जुन्या महामार्गाच्या सुधारणा प्रक्रियेत
दरम्यान, मुंबई पुणे पुणे एक्सप्रेसवे च्या सुधारणा आणि रुंदीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एमएसआरडीसी) कडून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.
सध्या या जुन्या महामार्गावर आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीकडून २०३० पर्यंत टोल वसुली केली जात आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसी करणार की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवले जाणार, याबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा अपेक्षित
मुंबई–पुणे दरम्यान सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि सणासुदीच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रस्तावित तिसरा द्रुतगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर या कोंडीवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


