मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होऊन महापौरही विराजमान झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती केली आहे.
नागपूर महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची बदली पुणे येथे करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. इटनकर यांना आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता; मात्र आता त्यांची अधिकृतपणे बदली करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार, डॉ. इटनकर यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांच्याकडे नागपूर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.
शासनाच्या आदेशात काय?
सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर महानगरपालिकेच्या रिक्त आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात येत असून त्यांनी तत्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत नागपूर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळावा.
डॉ. विपीन इटनकर यांची कारकीर्द
डॉ. विपीन इटनकर हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी प्रशासनात येण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला.
राज्यातील विविध जिल्ह्यांत त्यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केले आहे. नागपूर जिल्हाधिकारी म्हणून ते सध्या कार्यरत असून यापूर्वी त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


