मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. धावांचा पाऊस, षटकारांचा वर्षाव आणि शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेली लढत अशा नाट्यमय वातावरणात भारताने ७ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण ३४ षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, जी स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी ठरली.
"Bapu tari fielding kamal che!" 🔥
Out of words for that sensational catch by Axar Patel to end Harry Brook’s stay at the crease! 👏
Catch of the tournament? 🤔
ICC Men’s #T20WorldCup | Semi-final 2 | #INDvENG | LIVE NOW 👉 https://t.co/L2OuYBUDbL pic.twitter.com/qFwnou3pCo
— Star Sports (@StarSportsIndia) March 5, 2026
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाया संजू सॅमसनच्या दमदार खेळीने रचला. सॅमसनने ४२ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा करत डावाला भक्कम सुरुवात करून दिली. त्याला इशान किशन (३९), शिवम दुबे (४३), हार्दिक पांड्या (२७) आणि तिलक वर्मा (२१) यांनी मोलाची साथ दिली.
२५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार प्रतिकार केला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीला महत्त्वाचे धक्के देत भारताला सामन्यात वरचढी मिळवून दिली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा झेल अक्षर पटेलने अप्रतिम पकडला, ज्यामुळे इंग्लंडवर दबाव वाढला. त्यानंतर विल जॅक्सच्या झेलमध्येही अक्षरचे योगदान महत्त्वाचे ठरले.
दरम्यान, जेकब बेथलने ४८ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०५ धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्यामुळे सामना अखेरच्या षटकांपर्यंत रंगला.
मात्र भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आखलेली गोलंदाजीची रणनीती निर्णायक ठरली. त्याने जसप्रीत बुमराहची दोन षटके अखेरसाठी राखून ठेवत इंग्लंडच्या धावगतीवर लगाम घातला. अखेरच्या पाच षटकांत इंग्लंडला केवळ ६१ धावा करता आल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्सही गमवाव्या लागल्या.
हार्दिक पांड्याने टाकलेले १९वे षटकही सामन्याला कलाटणी देणारे ठरले. त्या षटकात त्याने केवळ ९ धावा देत एक विकेट घेतली. त्यामुळे इंग्लंडसमोर शेवटच्या षटकात ३० धावांचे कठीण आव्हान उभे राहिले. हार्दिकने ४ षटकांत ३८ धावांत २ बळी घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ३३ धावा देत १ बळी घेत अचूक मारा केला, तर शिवम दुबेने दडपणाखाली शेवटचे षटक प्रभावीपणे टाकत भारताचा विजय निश्चित केला.
सॅमसनचे आक्रमक फलंदाजी, बुमराह आणि पांड्याची अचूक गोलंदाजी, दुबेचे धाडसी षटक आणि अक्षर पटेलची अप्रतिम क्षेत्ररक्षणाची कामगिरी यामुळे भारताने इंग्लंडचा ७ बाद २४६ धावांवर रोखत संस्मरणीय विजय नोंदवला.


