बुलढाणा प्रतिनिधी
हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
रोहिणी प्रवीण म्हस्के (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर काही काळ तिचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून ‘हुंडा कमी दिला’ या कारणावरून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, पतीच्या व्यवसायासाठी चारचाकी वाहन घेण्याच्या निमित्ताने आणखी एक लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार केली जात होती, असेही फिर्यादीत नमूद आहे. समेटाच्या प्रयत्नातून माहेरच्यांनी दहा हजार रुपये दिले होते; तथापि, पैशांसाठीचा तगादा कायम असल्याचे सांगण्यात आले आहे.
२ मार्च २०२६ रोजी सततच्या छळाला कंटाळून रोहिणीने राहत्या घरात गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बोराखेडी बुद्रुक येथील परमेश्वर बाबासाहेब मोरे (वय ४२) यांनी बीबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण करीत आहेत.
दरम्यान, रोहिणीच्या पश्चात दीड वर्षांचा मुलगा विश्वराज असून आईच्या निधनामुळे तो मातृछत्रास मुकला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


