बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा : स्वातंत्र्याला अनेक दशके उलटूनही दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव बुलढाणा जिल्ह्यात समोर आले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटपरी येथे सर्पदंश झालेल्या २० वर्षीय गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याअभावी या महिलेला नातेवाईकांनी चक्क झोळीतून रुग्णालयापर्यंत नेले.
चाळीसटपरी येथील सादुरी राधेशाम खरात (वय २०) यांना २५ ऑगस्ट रोजी सर्पदंश झाला. विषाचा परिणाम वाढत असल्याने त्यांची प्रकृती बिघडू लागली. मात्र गावातून बाहेर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नातेवाईकांसमोर मोठे संकट उभे राहिले. अखेर बांबूला चादर बांधून झोळी तयार करण्यात आली आणि सादुरी यांना खांद्यावर घेत नातेवाईकांनी खडतर वाट पार करत भिंगारा गाव गाठले.
त्यानंतर त्यांना जळगाव जामोद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सर्पदंशावरील आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला.
अकोल्याकडे नेत असतानाच सादुरी यांची प्रकृती आणखी खालावली आणि वाटेतच त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या घटनेत सादुरी यांच्यासह त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. रस्त्याअभावी वेळेत रुग्णालय गाठता न येणे आणि प्राथमिक आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा जीव गेला, अशी हळहळ परिसरात व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्गम भागातील नागरिकांना आजही उपचारासाठी झोळीचा आधार घ्यावा लागत असल्याने या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

