बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात एका खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवण्यात वन्यजीव प्रेमींना यश आले आहे. पोहायला जाणाऱ्या एका तरुणाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणेकडे वारंवार दाद मागूनही मदत न मिळाल्याने अखेर खासगी बचाव पथकाने धाव घेत या मुक्या प्राण्याचे प्राण वाचवले. मात्र, दुर्दैवाने त्याच विहिरीत अन्य एक कोल्हा मृतावस्थेत आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी विलास जाधव हे तरुण आपल्या मित्रांसह गावातील विहिरीवर पोहायला जात असताना त्यांना एका बाजूच्या विहिरीत हालचाल जाणवली. कुतूहलापोटी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, विहिरीच्या तळाशी एक कोल्हा अडकल्याचे दिसून आले. विहीर खोल असल्याने त्या प्राण्याला बाहेर येणे शक्य नव्हते. जाधव यांनी तातडीने ‘वापरा’ (WAPARA) या वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेच्या सूचनेनुसार जाधव यांनी वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली. त्यानंतर एका वन अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी ‘आम्ही मदतीसाठी येत आहोत’ असे सांगितले. मात्र, बराच वेळ उलटूनही कोणीच न आल्याने जाधव यांनी पुन्हा संपर्क साधला असता, ‘आम्ही तिथे येऊन गेलो’ असे सांगत अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अखेर ‘वापरा’ संस्थेने आपल्या नेटवर्कचा वापर करत ‘वास्ट’ (WAST)वर मुंबई येथे कार्यरत आसलेल्या मुंबई-ठाणे या वन्यजीव बचाव ग्रुपवर ही माहिती प्रसारित केली. या ग्रुपमधील सदस्यांनी तातडीने स्थानिक सर्पमित्र आणि प्राणीमित्रांना पाचारण केले. ५ मे रोजी सकाळीच हे पथक घटनास्थळी युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया ॲनिमल रेस्क्यू हेड वैभव लाखोले, मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश बनकर, डायरेक्टर ज्ञानेश्वर शास्त्री , पोहोचले.आणि त्यांनी कोल्ह्याला सुरक्षित बाहेर काढले.
रेस्क्यू दरम्यान विहिरीच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक कोल्हा मृतावस्थेत पडलेला दिसला, ज्याचा कदाचित काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. वाचवण्यात आलेल्या कोल्ह्यावर सध्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून,पूढील उपचारा करीता वन विभागाच्या ताब्याॅत देण्यात आले आहे. उदासीनतेबद्दल वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.


