मुंबई प्रतिनिधी
फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या धुलीवंदनाच्या निमित्ताने राज्यासह देशभर रंगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असताना दादरमधील शिवाजी पार्क येथे उत्साहाचे वेगळेच चित्र अनुभवायला मिळाले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत रंगांची उधळण केली आणि गाण्यांच्या तालावर ठेका धरत धुळवड साजरी केली.
सोमवारी होळी दहनाने उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी रंगांची उधळण सुरू झाली. दादर परिसरातील शिवाजी पार्कमध्ये दररोज सकाळी फिरायला, योगाभ्यासासाठी आणि मैफलींसाठी एकत्र येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने यंदाही आपली परंपरा कायम ठेवली. सकाळी नियमित भेटीनंतर त्यांनी एकमेकांना अबीर-गुलाल लावून शुभेच्छा दिल्या.
या वेळी काही ज्येष्ठांनी जुन्या हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्याचीही रंगत वाढवली. वयाची साठ-सत्तरी ओलांडलेले नागरिक उत्साहाने गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत होते. परिसरात उपस्थित असलेल्या तरुणांनीही या आनंदसोहळ्यात सहभाग घेतला. ज्येष्ठांचा उत्साह पाहून अनेकांनी त्यांच्या जोशाचे कौतुक केले.
दरम्यान, शहरातील विविध भागांत तरुणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून धुळवड साजरी करताना दिसली. रंग, पाण्याच्या फवाऱ्यांसह डीजेच्या तालावर जल्लोषाचे वातावरण होते. मात्र काही ठिकाणी शांततेत आणि संयमाने सण साजरा करण्याचेही आवाहन करण्यात आले.
धुळवड हा केवळ रंगांचा नव्हे, तर मैत्री, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य दृढ करणारा उत्सव असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. शिवाजी पार्कमधील ज्येष्ठांचा उत्साह हा त्याचाच प्रत्यय देणारा ठरला.


