मुंबई प्रतिनिधी
राज्यात नव्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकरभरतीला गती देण्याच्या हालचाली सुरू असतानाच मुंबई महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल ५६ हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची अधिकृत कबुली प्रशासनाने दिली असून सुमारे ९ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात सुमारे ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली होती. सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावलीतील सुधारणा संदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील दीर्घकाळ रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून जोर धरत आहे.
मुंबई महापालिकेवर नव्याने सत्तांतर झाल्यानंतर भरती प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मूलभूत नागरी सेवांवर ताण येत असल्याचा संघटनांचा दावा आहे.
पालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये एकूण १,४५,२५६ पदांची मंजूर तरतूद आहे. त्यापैकी ८९,१३० पदांवर कर्मचारी कार्यरत असून ५६,१२६ पदे रिक्त आहेत. सध्या विविध संवर्गांतील ९,२९५ पदांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यापैकी ५,४८६ पदांवरील नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पदे आवश्यकता व प्राधान्यक्रमानुसार टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, महसुली खर्चावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने महापालिकेतील आस्थापना रचनेचा फेरआढावा घेण्याचे संकेत अलीकडील अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. संगणकीकरणामुळे कामकाजाच्या पद्धतीत झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पदांची संख्या कमी-जास्त करण्याची, अर्हतांमध्ये बदल करण्याची तसेच कालबाह्य भत्ते बंद करण्याची प्रक्रिया हाती घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आतापर्यंत २७ खात्यांची आस्थापना रचना अद्ययावत करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


