मुंबई प्रतिनिधी
रंगपंचमीच्या उत्साहात रंगांची उधळण करताना डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या अनेक कृत्रिम रंगांमध्ये विषारी व रासायनिक घटकांचे प्रमाण अधिक असल्याने त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान होण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धुळवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही रंगांमध्ये वस्त्रांना रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक डाईंचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. मेटल अॅसिड, अल्कली पावडर, काच भुकटी यांसारख्या घटकांबरोबरच काळ्या रंगात लेड ऑक्साईड, हिरव्या रंगात कॉपर सल्फेट, तर लाल रंगात मर्क्युरी सल्फेट यांसारख्या धोकादायक रसायनांचा वापर केला जातो. काही रंगांना चमक आणण्यासाठी काचेची पूड, ऍस्बेस्टॉस, चॉक पावडर किंवा सिलिका मिसळली जाते. या घटकांमुळे डोळ्यांत जळजळ, सूज, कॉर्नियाला इजा आणि गंभीर प्रसंगी दृष्टीदोष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फुगे व कठीण वस्तूंचा धोका
रंगाने भरलेले फुगे वेगाने डोळ्यावर आदळल्यास कॉर्नियाला जखम होण्याचा धोका असतो. गंभीर प्रसंगी रेटिनालाही धक्का बसू शकतो. दगड किंवा कठीण वस्तू लागल्यास दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्वउपचार टाळून तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डोळ्यात रंग गेल्यास स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवावे; जळजळ होत असल्यास डोळे चोळू नयेत. लक्षणे गंभीर वाटल्यास जवळच्या रुग्णालयात त्वरित दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्णसंख्येत वाढ
रंगपंचमीनंतरच्या दिवशी डोळ्यांत जळजळ, सूज किंवा धूसर दृष्टी अशा तक्रारींसह रुग्ण उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेषतः मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये रंगफुग्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या जखमा अधिक आढळतात. दाट लोकवस्तीच्या शहरांत सार्वजनिक ठिकाणी रंगांचा मारा टाळणे, जबाबदारीने सण साजरा करणे आणि सेंद्रिय रंगांना प्राधान्य देणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
साधे उपाय, सुरक्षित सण
• रंग खेळताना साधा चष्मा किंवा गॉगलचा वापर करावा.
• कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे शक्यतो टाळावे.
• डोळ्यांच्या भोवती कोल्ड क्रीम लावल्यास रंग त्वचेवर कमी चिकटतो.
• रंग खेळण्यापूर्वी अंगावर तेल लावल्यास रंग लवकर निघतो.
• रंग काढताना डोळे घट्ट मिटून कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.
रंगोत्सवाचा आनंद लुटताना आरोग्याची काळजी घेतल्यासच सण खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुखद ठरेल, असे तज्ज्ञांनी अधोरेखित केले.


