पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लविद्येचा मानबिंदू मानली जाणारी ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे रंगणार असून स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेचा वासापूजन व मातीपूजन समारंभ आज सोमवारी (२ मार्च) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने स्थानिक आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीनुसार राज्यातील ४२ जिल्हा कुस्तीगीर संघांकडून मातीचे कलश आणून त्या पवित्र मातीत स्पर्धेचे आखाडे तयार करण्यात येणार आहेत. या विधीमुळे स्पर्धेला सांस्कृतिक व आध्यात्मिक अधिष्ठान लाभते, अशी भावना कुस्तीपरिवारात व्यक्त केली जाते.
यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच देण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या भव्य पारितोषिकाची अधिकृत घोषणा याच सोहळ्यात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे राज्यभरातील मल्ल व कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
वासापूजन-मातीपूजन सोहळ्यासाठी वाघोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच राज्याच्या विविध भागांतील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक विधींनी सजलेल्या वातावरणात हा मंगल सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा राज्यातील मल्लांसाठी प्रतिष्ठेचे शिखर मानली जात असून यंदाही नामांकित मल्लांच्या सहभागाने रंगतदार सामने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


