मुंबई प्रतिनिधी
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, उद्या शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभर ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचा मोठा शुभारंभ होणार आहे. या देशव्यापी मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील अजमेर येथून सकाळी ११:३० वाजता होणार आहे.
पंतप्रधानांच्या या देशव्यापी उद्घाटनानंतर महाराष्ट्र आणि मुंबईतही या मोहिमेला अधिकृत सुरुवात केली जाणार आहे. मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्णालयामध्ये सकाळी ११:३० वाजता या लसीकरण मोहिमेचा भव्य सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कुणाला मिळणार ही लस?
ज्या मुलींचे वय १४ वर्षे पूर्ण झाले आहे, परंतु १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत, अशा वयोगटातील मुलींना भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही लस दिली जाणार आहे. नायर रुग्णालयातील कार्यक्रमानंतर लगेचच अशा ५ लाभार्थी मुलींना मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस टोचली जाईल.
हा कार्यक्रम नायर रुग्णालयातील परिचारिका निवासस्थानाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. भविष्यातील कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, मुंबई महानगरपालिकेने या उपक्रमाची जय्यत तयारी केली आहे.


