जळगाव प्रतिनिधी
अवघ्या दहा हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल दोन लाख रुपये व्याज भरूनही सावकाराचा तगादा, मारहाण आणि कुटुंबीयांवरील शिवीगाळ यांना कंटाळून २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा शहरात उघडकीस आली आहे. योगेश सुनील चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या छळाचा उल्लेख केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित सावकारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश चौधरी हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आर्थिक अडचणीमुळे त्याने काही काळापूर्वी पिंटू नामक व्यक्तीकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. मात्र या अल्प रकमेच्या बदल्यात सावकाराने अत्यधिक व्याज आकारत योगेशकडून सुमारे दोन लाख रुपये वसूल केल्याचे समोर आले आहे. तरीही आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवत त्याच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता.
२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास योगेशने राहत्या घरी गळफास घेतला. कुटुंबीयांना तो मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
चिठ्ठीत छळाचा उल्लेख
मृत्यूपूर्वी योगेशने लिहिलेल्या चिठ्ठीत सावकार पिंटू याच्या पैशांच्या तगाद्यामुळे व मारहाणीमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. स्वतःला मारहाण केल्याबरोबरच आई-वडिलांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप त्याने केला आहे. “माझ्या मृत्यूस पिंटू जबाबदार असून त्याला कडक शिक्षा व्हावी,” अशी मागणीही त्याने चिठ्ठीत नोंदवली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
योगेशच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार असून संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करून जगत होते. घरातील कमावत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व नागरिकांकडून केली जात आहे.
तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाइड नोट, कर्जव्यवहार आणि छळाच्या आरोपांच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सांगितले. प्राथमिक चौकशीत बेकायदा सावकारी, अत्यधिक व्याज आणि धमकावणे यांचे मुद्दे समोर येत असल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


