मुंबई प्रतिनिधी
कवि. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ‘मराठीचा जागर’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीचा जागर करत कुसुमाग्रजांना अभिवादन करण्याचा हेतू या सोहळ्यामागे असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक आणि विचारमंथनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. खासगी क्षेत्रातील नोकरभरतीत मराठी युवकांना संधी मिळावी, तसेच मराठी संवर्धनासाठी संघटनेची भूमिका यावरही चर्चा होणार आहे.
सोहळ्यानिमित्त सभागृह परिसर भगवामय झाला असून, सांस्कृतिक कार्यक्रमांत ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय संगीत सादरीकरणाचा समावेश आहे. संयोजक मंदार कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोनियमवादक आदित्य ओक आणि सिंथेसायझरवादक सत्यजित प्रभू यांचे सादरीकरण होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे मराठी भाषेसाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीस महासंघातर्फे सन्मानित केले जाते. यंदाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पी.एन.जी. ज्वेलर्सचे सहकार्य लाभले आहे.
महासंघाचे अध्यक्ष व खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते सोहळ्याच्या तयारीत गुंतले आहेत. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मराठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.
स्थळ: बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरीन लाइन्स
वेळ: सायंकाळी ५ वा.


