बारामती प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी अत्यंत खळबळजनक आरोप करत “या अपघातामागे कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा दावा केला. अपघाताच्या तांत्रिक चौकशीबरोबरच गुन्हेगारी पैलूंचीही स्वतंत्र तपासणी व्हावी, तसेच नागरी उड्डाण नियामक यंत्रणांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी बारामती पोलिसांकडे केली.
मुंबईत एफआयआर नोंदविण्यास नकार?
रोहित पवार यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी DGCA (नागरी उड्डाण महासंचालनालय) यांनी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात ‘व्हीएसआर’ या विमान सेवा कंपनीतील त्रुटींचा उल्लेख आहे. त्यानंतर त्यांनी व काही आमदारांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात DGCA व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तो नोंदविण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘दोषी विमान जाणूनबुजून दिले का?’
DGCA च्या अहवालानंतर व्हीएसआर कंपनीची पाच विमाने ग्राउंड करण्यात आल्याचे सांगत रोहित पवार म्हणाले, “जर संबंधित कंपनीची विमाने दोषपूर्ण ठरली असतील, तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तेच विमान चुकून देण्यात आले की जाणूनबुजून? याचा सखोल तपास आवश्यक आहे.” त्यांनी या प्रकरणी व्हीएसआर कंपनी व उड्डाणास परवानगी देणाऱ्या DGCA अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप
देशाचे नागरी उड्डाण मंत्री ज्या पक्षातून येतात, त्या पक्षाचे व व्हीएसआर कंपनीचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. “मंत्र्यांचे नाव आम्ही घेतलेले नाही; मात्र जर अशा प्रकारचे व्यवहार सिद्ध झाले, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. लोकांच्या भावना सरकारने लक्षात घ्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
‘तांत्रिक चौकशीपुरती मर्यादा नको’
विमान अपघातांची चौकशी करणारी AAIB (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) ही संस्था प्रामुख्याने तांत्रिक बाबींची तपासणी करते; गुन्हेगारी पैलूंचा तपास तिच्या कार्यक्षेत्रात नसतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. DGCA वरच जबाबदारी असल्याचा आमचा आरोप असल्याने त्यांनाच सर्व अधिकार दिल्यास निष्पक्ष तपास होईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे या अपघाताचा तांत्रिक व गुन्हेगारी अशा दोन्ही अंगांनी स्वतंत्र तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
दरम्यान, बारामती पोलिसांनी रोहित पवार यांच्या तक्रारीवर कायदेशीर सल्लामसलत करून पुढील निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


