नाशिक प्रतिनिधी
गोदावरीच्या पवित्र तीरावर मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा वैश्विक महोत्सव रंगणार असून राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित चौथे ‘विश्व मराठी संमेलन’ गुरुवार (२६ फेब्रुवारी)पासून नाशिकमध्ये प्रारंभ होत आहे. मराठी बोलीभाषांच्या वैविध्यपूर्ण महोत्सवाने सकाळी साडेआठ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साहित्य, भाषा, लोकपरंपरा, नाट्य, चित्रपट, संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञानातील मराठीचा प्रवास यांचा बहुआयामी वेध घेतला जाणार आहे.
संमेलनाचा औपचारिक उद्घाटन समारंभ शुक्रवार (२७ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उद्योग व मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी भाषा विभागाचे ३५ मानकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
साहित्य-भाषा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्यभूषण’ पुरस्कार, तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच शांतिब्रह्म व गुरुवर्य मारुती बाबा कुरेक यांना ‘विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार’ प्रदान होणार आहे.
सांगता समारंभात कलारत्न पुरस्कार
संमेलनाची सांगता १ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होईल. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषण गवई, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, दिग्दर्शक जब्बार पटेल आणि महेश मांजरेकर उपस्थित राहणार आहेत. मराठी संगीतविश्वाला जागतिक पातळीवर नेणाऱ्या अजय-अतुल यांना ‘कलारत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
परंपरा ते आधुनिकतेचा सांस्कृतिक सोहळा
संमेलनाच्या पहिल्या दिवशी बोहाडा, अहिराणी गीत, झाडीपट्टी नाट्यप्रकार, आराधी लोकनृत्य, ‘जागर शिवबाचा’ आदी लोकपरंपरांचे सादरीकरण होणार असून रात्री ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक रंगणार आहे.
२७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून शोभायात्रा काढून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार वितरण होईल. सायंकाळी गायक राहुल देशपांडे यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित आहे.
विचारमंथन, परिसंवाद आणि नव्या युगातील मराठी
२८ फेब्रुवारी रोजी माध्यमातील मराठी, समाजमाध्यमांवरील प्रभावक, सांस्कृतिक विश्वातील भाषेचे स्थान या विषयांवर परिसंवाद होतील. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठीतील वापर’, ‘मराठी प्रकाशनांचे बदलते प्रवाह’, ‘आंतरराष्ट्रीय मंच’ अशा विषयांवरील सत्रांतून जागतिक संदर्भातील मराठीचा वेध घेतला जाणार आहे.
युवा सहभाग, शिक्षण आणि चित्रपटातील मराठी
१ मार्च रोजी युवा वर्गाचा सहभाग, अभ्यासक्रमातील मराठी आणि मराठी चित्रपटातील आधुनिकीकरण या विषयांवर चर्चासत्रे होतील. कविसंमेलन, बालसाहित्य सत्र, मलखांब प्रात्यक्षिक, ‘द फोक’ व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी संमेलनाची सांगता होईल.
गोदातीरावर रंगणारे हे विश्व मराठी संमेलन परंपरा, साहित्य, कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगमातून मराठीची समृद्ध परंपरा आणि जागतिक वाटचाल अधोरेखित करणारा बहुआयामी सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.


