मुंबई प्रतिनिधी
शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवालामुक्त करण्यासह अतिक्रमणांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेचा आढावा आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणीद्वारे घेतला. एफ दक्षिण, एफ उत्तर आणि जी उत्तर या विभागांतील विविध भागांची अचानक भेट देत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाची पडताळणी केली. विशेषतः दादर परिसरातील कारवाईची स्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्ते व पदपथ फेरीवालामुक्त करण्याच्या मोहिमेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत वाहतूक सुरळीतता आणि पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई उपयुक्त ठरत असल्याचे मत मांडले. काही ठिकाणी उरलेल्या अतिक्रमणांबाबत तक्रारी व सूचना देखील नोंदवण्यात आल्या.
अनधिकृत फेरीवाला व अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही केवळ दंडात्मक स्वरूपाची नसून नागरी सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा तिचा व्यापक उद्देश असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन करून अतिक्रमणांविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने महानगरपालिका प्रशासनाला सक्रिय साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पाहणीवेळी उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उपआयुक्त (विशेष – अतिरिक्त कार्यभार) विनायक विसपुते यांच्यासह संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.


