मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमा व फेरीवाला-मुक्त रस्ते-पदपथ धोरणाचे सकारात्मक परिणाम आता नागरिकांना प्रत्यक्ष जाणवू लागले आहेत. विशेषत: जी उत्तर विभागातील अनेक रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व अतिक्रमणमुक्त झाल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभाग समन्वयाने कार्यरत आहेत. नियमित स्वच्छता मोहीमा, क्षेत्रनिहाय विशेष पथके, तक्रारींवर तत्काळ कारवाई आणि अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस-समन्वय यामुळे सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा दर्जा उंचावला असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून वर्षभर स्वच्छता उपक्रम राबविले जात असून पदपथ धूळमुक्ती, बेवारस वाहनांची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून तीन वेळा स्वच्छता-निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, उद्याने-क्रीडांगणांची निगा, राडारोडा हटविणे व फेरीवाला-मुक्त क्षेत्र निर्मिती आदी कामांवर भर दिला जात आहे. या कामासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या मोहिमांमुळे जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेठजी मार्ग, कटारिया मार्ग, ६० फूट व ९० फूट रस्ते तसेच शिवाजी पार्क परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ व पदपथ अतिक्रमणमुक्त झाल्याचे नागरिकांनी नमूद केले. काही प्रमुख पदपथ फेरीवालामुक्त झाल्याने पादचाऱ्यांना अडथळारहित मार्ग उपलब्ध झाला असून वाहतूक पोलिसांच्या तैनातीमुळे वाहतूकही सुरळीत झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.
या सकारात्मक बदलांमुळे स्वच्छता उपक्रम कायम ठेवावेत व इतर नागरी समस्यांवरही अशीच कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


