मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देवगिरी येथे झालेल्या बैठकीत पवार यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैठकीत उपस्थित आमदार व पदाधिकाऱ्यांनी हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दर्शविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे. औपचारिक घोषणा मात्र येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अपेक्षित आहे.
पक्षातील संघटनात्मक फेररचनेच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वात बदल करण्याची गरज अधोरेखित होत असताना सुनेत्रा पवार यांना पुढे करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या नावाभोवती सहमती निर्माण झाल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सूचित केले.
दरम्यान, अधिकृत घोषणा होईपर्यंत पक्षाकडून कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अध्यक्षपदाबाबतची स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


