सातारा, प्रतिनिधी
बारावीची परीक्षा देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक्स्ट्रा क्लाससाठी निघालेल्या या विद्यार्थिनीने हेल्मेटधारी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतल्यानंतर शुद्ध हरपली; शुद्धीवर आल्यानंतर ती थेट पुणे रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे लक्षात आले. स्थानिक व्यक्तीच्या मदतीने तिने कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर तिची सुखरूप सुटका झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्डे (ता. जावळी) येथील ही विद्यार्थिनी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास एक्स्ट्रा क्लाससाठी जात होती. मार्गात एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट दिली. त्यानंतर काय घडले, याची आठवण नसल्याचे पीडितेने सांगितले. “लिफ्ट घेतल्यानंतर पुढील काहीही आठवत नाही. शुद्धीवर आले तेव्हा मी पुणे रेल्वे स्थानक परिसरात होते,” असे तिचे म्हणणे आहे.
प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने तेथील एका स्थानिक व्यक्तीचा मोबाईल वापरून कुटुंबियांना संपर्क केला. कुटुंबीय तत्काळ पुण्यात पोहोचले व तिला घरी आणले. घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयिताचा शोध सुरू आहे. घटनास्थळे व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामागील हेतू काय, याचा तपास सुरू असून लिफ्ट घेताना खबरदारी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


