मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. अपघातामागे केवळ अपघाताचीच कारणे होती की अन्य काही घडले, याबाबत शंका उपस्थित होत असताना आमदार रोहित पवार यांनी काही व्हिडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे समोर आणत तपास प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीबाबत भूमिका स्पष्ट केली.
रोहित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अपघाताच्या दिवशीच्या घटनाक्रमाबाबत अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. “घटनेची संपूर्ण माहिती जनतेसमोर यावी,” अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र शंका उपस्थित करण्याचा अधिकार मान्य करतानाच अधिकृत चौकशीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. “अजित पवार हे राज्यातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेते होते. त्यांच्या अपघाताची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, ही मागणी रास्त आहे. प्रत्यक्षात मी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशीची विनंती केली होती,” असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने विशेष चौकशी समिती गठीत केल्याची माहिती देत फडणवीस म्हणाले, “या संदर्भातील पत्र प्राप्त झाले असून चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्सही हस्तगत झाला आहे. भारतातील चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे निष्कर्ष येईपर्यंत तर्क-वितर्क टाळावेत.”
चौकशी पूर्ण होण्यापूर्वी विविध अटकळी लावल्यास जनतेत संभ्रम वाढू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. “अजित पवार यांच्यावरील प्रेम आणि आदर लक्षात घेता सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की चौकशीचा अहवाल आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणाकडे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर बारकाईने पाहिले जात असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


